आज त्यांच्या मुलगा म्हणून जगातील सर्वात उंच शिखर सर केले, 15 पेक्षा जास्त विश्वविक्रम केले, 5 पुस्तके लिहिली, बिजनेस कोचिंग चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस केले. अनेकांना आता बिजनेस कोचिंग करत आहे. वर्षातून 30-35 पुस्तके वाचतो. एव्हडा अभ्यास केल्यानंतर समजते की कोणतेही पुस्तक न वाचता, अभ्यास न करता, कोर्स न करता वडील हे सर्व फॉलो करत होते.
-आनंद बनसोडे, लाईफ कोच, एवरेस्टवीर, महाराष्ट्र
एक रिक्षाचालक- Innovator ते उद्योजक- माझ्या वडिलांचा प्रवास
अगदी मी 7-8 वर्षांचा होतो तेव्हाचे पुसटचे आठवते दर रविवारी जुन्या बाजारातून आणलेले स्पॅनर स्टोव्ह वर तापवून माझे वडील त्यावर हातोडी चे नाजूक घाव घालत काहीतरी बनवत असायचे. तो तापलेला लालबुंद झालेला स्पॅनर पक्कडने पकडायची जबाबदारी माझ्या बहिणींवर व कधीकधी माझ्यावर असायची.वडील नक्की काय बनवत आहेत हे आम्हा कोणाला कल्पना नव्हती. त्या काळी गाड्यांच्या चाकांच्या तारा एक गोल रिंगने फिरवून बसवायची पद्धत होती. त्या काळात वडील या स्वतःच्या बिजनेसमध्ये “रिसर्च व डेव्हलपमेंट” हा महत्वाचा भाग अमलात आणत होते. त्यांनी याप्रकारे वेगवेगळ्या स्पॅनर तापवून, कापून प्रत्येक गाडीसाठी वेगवेगळ्या आकाराचे त्यातून वेगवेगळे बल लावून तारा फिट करण्यासाठी असे स्पॅनर बनवले होते.(फोटो-त्यांनी बनवलेले स्पॅनर) मी जेव्हा वडिलांच्या दुकानात जात असे तेव्हा अनेक लोक याचे कौतुक करायचे.
गाड्यांच्या चाकांचे आउट काढण्यासाठी सोलापूरमधील सर्व तालुक्यातील लोक तसेच लातूर, उस्मानाबाद, विजापूर येथूनही लोक यायचे. सोलापूरमधील सर्व मेकॅनिक सोबत वडिलांचे खूप चांगले रिलेशन होते. अजूनही आठवते- मी 9 वी नापास झाल्यावर रोज मी आणि वडील सायकलवर कामावरून सोबत घरी यायचो तेव्हा रोज वाटेतील (कधीकधी मुद्दाम वेगवेगळ्या मार्गाने) सर्व मेकॅनिक सोबत बोलत थांबायचे.(उगाच थांबतात म्हणून मला मात्र त्यावेळी भयंकर चिडचिड होत असे) कामाच्या गप्पा, एखादया गाडीबद्दल विचारपूस करायचे. पण आता मला हे समजते की बिजनेसमधील “नेटवर्किंग” हा महत्वाचा नियम ते फॉलो करत होते.
त्यावेळी होंडा कंपनी 2-3 जिल्हयातील चाकांची सर्व कामे वडिलांना देत असे. चाकांच्या तारा फिट करताना त्यात एक छोटे वायसर घातल्यास त्या जास्त टिकतात हा शोधही वडिलांनीच लावला. त्यावेळी चाकांच्या एका डिफेक्ट बद्दल होंडा सोबत केलेला पत्रव्यवहारही मला आठवतोय. एकंदरीत “चाकांचे काम= अशोक बनसोडे” हे समिकरण वडिलांनी बनवले होते. बिजनेस मध्ये स्वतःची “मोनोपॉली” निर्माण करणे हा अतिशय महत्वाचा नियम वडिलांनी फॉलो केला होता.
प्रत्येक कस्टमर सोबत डोक्यावर साखर ठेवून बोलणे. मला अजूनही आठवते एखाद्या व्यक्तीने 5 रु जरी कमी दिले तर ‘सर्वात मोठा दुश्मन आहे’ अश्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहायचो. वडिलांनी भांडून पैसे घ्यावे असे मला वाटायचे. पण वडील नेहमी गोड बोलायचे. एकदा चाक आउट काढलेला व्यक्ती 1 वर्षानेच वडिलांकडे येत असे इतके चांगले काम ते करत असत. सर्व कस्टमरना लक्षात ठेवणे, त्यांच्या गावाचे नाव, काय काम करतात इ विचारपूस करून एक नाते जोडायचे. एखादे काम नीट झाले नाही तर ते कस्टमरला चाकातील अडचण सांगायचे. “कस्टमर Satisfaction” हा महत्वाचा नियम वडील त्यावेळी फॉलो करत होते.
काही काळानंतर प्रत्येक वेळी वडील कामात काहीतरी नावीन्य आणायचे. गाड्यांच्या जुन्या रिम पासून टेबल, खुर्च्या, दरवाजा, ड्रेसिंग टेबल, आरसा फ्रेम, मोठे गेट इ बनवून सर्व नातेवाईकांना गिफ्ट देत असत. हे बनवताना किंवा रोजचे काम करताना ध्यान लागलेल्या बुद्धांसारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचे. फक्त ते फिरणारे चाक, हातोडा हेच त्यांना दिसायचे. फोकस हा महत्वाचा नियम ते फॉलो करत होते. भंगारात असलेली जुनी चाकाची तार ते हैद्राबाद येथे पाठवायचे त्यावर प्लेटिंग (मेटल थर) करून अर्ध्या किंमतीत ते अनेकांना विकत असत. 10-15 वर्षांपूर्वी बसवलेल्या अनेक तारा अजूनही टिकल्या आहेत. लोक अजूनही भेटून मला सांगतात की तुझ्या वडिलांनी बसवलेल्या तारा आहेत. बिजनेसमध्ये “Legacy” तयार करत होते.
मला लहानपणापासून ज्यांनी पाहिले आहे त्यांना माहीत आहे की प्रत्येक वेळी माझी सायकल सर्वात वेगळी असायची. एकदा पूर्ण सायकल सिल्वर प्लेटिंग केली होती, सायकलला गाड्याचे हँडल बसवणे, वेगळा कलर देणे असे अनेक गोष्टी वडील करत असत. स्वतःचे वेगळेपण जपणे हा महत्वाचा नियम वडील फॉलो करत होते. बिजनेसमध्ये अनेक चढउतार येतात- जिथे कामाला बसत होते तिथून बाहेर पडायला भाग पाडणे असेल किंवा महापालिकेचा गाळा फसवून वडिलांना विकणारा व त्यांच्याकडून पैसे घेणारा एक व्यक्ती असेल अश्या लोकांना वडिलांनी अतिशय शांततेने उत्तर दिले. “धीरगंभीरता व चांगुलपणावर विश्वास” हीच वडिलांची सर्वात मोठी ताकत होती.
आज त्यांच्या मुलगा म्हणून जगातील सर्वात उंच शिखर सर केले, 15 पेक्षा जास्त विश्वविक्रम केले, 5 पुस्तके लिहिली, बिजनेस कोचिंग चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस केले. अनेकांना आता बिजनेस कोचिंग करत आहे. वर्षातून 30-35 पुस्तके वाचतो. एव्हडा अभ्यास केल्यानंतर समजते की कोणतेही पुस्तक न वाचता, अभ्यास न करता, कोर्स न करता वडील हे सर्व फॉलो करत होते. आज त्यांच्याच अनुवंशिक गुणांनी मी स्वतः बिजनेस उभे करत आहे. प्रत्येक वेळी अडचण आली असताना, संकट आले असता वडील या ठिकाणी असते तर कसे वागले असते हा विचार करून निर्णय घेत असतो.
आज 3 मार्च- माझे वडील अशोक बनसोडे यांचा वाढदिवस…हे सर्व फॉलो करून त्यांच्या प्रेरणेने आयुष्यात सर्वोच्च उंची गाठू शकेल असा विश्वास माझ्यात आहे. आजही वडिलांनी चाकावर घातलेले हातोडीचे घातलेले घाव ऐकू येऊन मला संमोहित करून कार्यमग्न राहण्याची प्रेरणा देतात. प्रत्येक घावासोबत त्यांच्या कपाळावरून पडलेला घामाचा थेंब हा माझ्यासाठी सर्वोच्च प्रेरणेचा स्रोत असतो. -आनंद अशोक बनसोडे
www.anandbansode.com