विनोदी भूमिकेचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ काळाच्या पडद्याआड

Share with others

मुंबई: (विशेष प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिका आणि बहुआयामी अभिनयाने तीन पिढ्यांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचे सोमवारी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

‘असरानी’ याच नावाने लोकप्रिय असलेले गोवर्धन असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर, राजस्थान येथे झाला. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) मधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जवळपास पाच दशकांहून अधिकच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना निखळ आनंद दिला.

विनोदी, नकारात्मक आणि चरित्र भूमिकांमध्ये त्यांचा सहज वावर होता, पण रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) या चित्रपटातील ‘जेलर’ची भूमिका त्यांच्या कारकिर्दीचा माईलस्टोन ठरली. “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं!” हा त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर कायम आहे. याशिवाय ‘बावर्ची’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘खट्टा मीठा’, ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘धमाल’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि कथालेखनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अभिनेते असरानी गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी जमा झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

असरानी यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या निधनाची बातमी सार्वजनिक न करता त्याच दिवशी सायंकाळी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही गाजावाजा न करता, केवळ कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अंतिम विधी पार पाडावेत, अशी त्यांची अखेरची इच्छा होती, जी कुटुंबाने पूर्ण केली. त्यांच्या पश्चात पत्नी मंजू असरानी आणि कुटुंबातील सदस्य आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारा हरपला असून, हास्यसम्राट असरानी यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!

गोवर्धन असरानी (जन्म: जानेवारी १, १९४१ – निधन: ऑक्टोबर २०, २०२५)

Related posts

Leave a Comment