होमबाऊंड : अनेक भ्रामक फुग्यांना टोचणारी अणकुचीदार टाचणी…!!

Share with others

दिग्दर्शक नीरज घायवान यांचा “मसान” हा चित्रपट जेव्हा आला होता. त्या पहिल्याच फिल्ममध्ये नीरज घायवान याने आपली प्रतिभा अन वेगळेपण सिद्ध केले होते आणि समीक्षकांनी दखल घ्यावी अशी कामगिरी “मसान” फिल्मने केली होती अर्थात यात लेखक म्हणून वरुण ग्रोव्हर याचा सुद्धा तितकाच हातभार होता.
आता हीच जोडगोळी पुन्हा “होमबाऊंड” नावाचा सिनेमा घेऊन आलीय. ज्या सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत निवड झालीय…इतकं सगळं असताना “होमबाऊंड” बघणं आवश्यक होतं. “होमबाऊंड” बद्दल लिहायचं तर ही फिल्म वास्तवदर्शी असल्याने यातील पात्र ही आपल्याला कुठंतरी पाहिलेली वाटतात…जवळची वाटतात….ही गोष्ट उत्तर भारतात घडताना दाखवली आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या दोन मित्राची गोष्ट त्यातील एकजण मुस्लिम समाजातील आहे तर एकजण दलित….दोघेही आपल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत. पण आजूबाजूला बदलत्या जगासोबत बदलत असणाऱ्या काही ‘ग्लोबल’ गोष्टी अन कधीही न बदलणाऱ्या काही ‘जाचक’ गोष्टी यांचे चटके सहन करीत हे दोन्ही मित्र आपापल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत आहेत….त्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत…. पण, त्याचं स्वप्न साकार होण्याच्या प्रवासात अनेक काटे आहेत, मग ते समाजात वावरताना त्यांना त्यांच्या जातीची कुणीतरी जाणीव करून देणे असेल किंवा हीन लेखणं असेल, किंवा त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं असेल या गोष्टी पाहताना त्या तुमच्या अंगावर येतात. समाजातील अनेक लोकांना एखाद्या व्यक्तीला टारगेट करून सहजपणे त्याची जातीवरून किंवा परिस्थितीवरून मस्करी करताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल अशी साधी जाणीव सुद्धा कुणी करताना दिसत नाही. ते अगदी सहजपणे असतं असं आपण समजतो….पण, या जगात अनेक लोकांचं जगणं हे इतकं सहज नसतं…रोजच्या रोज काबाडकष्ट करूनही त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतात अन त्या शून्यातून बाहेर येण्यासाठी…फक्त सन्मानाने जगता यावे म्हणून ते संघर्ष करत असतात अश्याच संघर्षशील लोकांची “होमबाऊंड” ही गोष्ट आहे.

अनेक विषमतेच्या समरसतेने भरलेला हा “समाज” अन त्यात वावरणाऱ्या असंवेदनशील “झुंडी” अन त्या झुंडीना भ्रष्ट पैश्याने पोसणारे “राजकारणी” अन या सर्वांवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण करणारे “भांडवलदार”….मग ते देशातील असो किंवा जागतिक स्तरावर राज्य करणारे असो….आजचं आपलं सामान्य माणसाचे जीवन या सगळ्या गोष्टीनी ढवळून निघालंय….या लॉबीने त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले ‘निर्णय’ अन त्याचा आपल्या जगण्यावर होणारा ‘परिणाम’ हा इतका आहे की भारतातील प्रत्येक माणूस आज “गिनी पिग” होऊन जगतोय, हतबल होऊन जगतोय ही हतबलता जागतिक स्तरावर कोरोना नावाच्या महामारीच्या वेळेस सर्वांनी अनुभवलीय….”होमबाऊंड” ही अश्याच हतबलतेची कहाणी तुमच्यासमोर मांडते…!माणसाच्या आयुष्यात जसे सुखदुःखाचे अनेक पदर येत-जात राहतात एखाद्या ऋतूसारखे पण माणसाचं जगणं मात्र कधीही थांबत नाही ते सुरूच राहतं…अव्याहतपणे वाहणाऱ्या निर्मळ नदीच्या प्रवाहासारखं….”होमबाऊंड” फिल्म पाहताना तुम्ही अश्याच प्रवाहाचे एक भाग बनून जातात….म्हणून “होमबाऊंड” ही फिल्म एक अनुभव आहे ज्याचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेतला पाहिजे. सिनेमाच्या केंद्रस्थानी जरी ही वरवर पाहता दोन मित्राची गोष्ट वाटत असली तरी ही आजच्या नव्या काळातल्या भारताची कहाणी आहे. आपल्या रोजच्या जगण्यात समाविष्ट असणारे जात, वर्ग, धर्म, आर्थिक विषमतेचे स्तर याचं वास्तव दर्शन एक प्रेक्षक म्हणून आपल्या समोर घडताना विकासाचा एक भ्रामक फुगा “होमबाऊंड” नावाच्या टाचणीने फटकन फुटतो…याचा आवाज ऑस्करपर्यंत जाणार आहे याचा मात्र नक्कीच आनंद आहे.
यात ईशान खट्टर नावाच्या अभिनेत्याने कमाल केलीय त्याने साकारलेला “शोएब” हा कधी खूप निरागस , तर कधी हतबल झालेला त्याच्या पात्राला पडद्यावर साकारताना त्याने व्यक्तीरेखेतील हे भावनात्मक पदर खूप छान उलगडून दाखवलेत…त्याला अगदी तोडीस तोड साथ दिलीय ती विशाल जेठवा याने त्याने साकारलेला “चंदन” ही उत्तम जमून आलाय त्याच्या तोंडी एक संवाद आहे ” सच बोलते है तो सबसे दूर हो जाते है, और झूठ बोलते है तो खुद से “
चित्रपटात जान्हवी कपूर असूनही तिची भूमिका कुठंही ग्लॅमरस होऊ न देता अगदी संयतपणे तिने प्रामाणिकपणे साकारलीय. इतर कलाकारांनीही अगदी वास्तवदर्शी अभिनय केला आहे.
आपल्या जगण्यातला ढोंगीपणा, चंगळवादी बुरख्याआड लपलेला फॅसिस्टवाद, सगळंकाही आलबेल आहे असं म्हणून जगत असणारा पण आतून मेलेला माणूस, असल्या भ्रामक फुग्यांना “होमबाऊंड” नावाची फिल्म अणकुचीदार टाचणी सारखी टोचेल….तर ज्यांच्या सामाजिक संवेदना अजूनही जाग्या आहेत त्यांना ही फिल्म अंतर्मुख करेल.

शब्द : संजय भारतीय, प्रसिद्ध पटकथा लेखक, लेखक, कवी व समीक्षक

Related posts

Leave a Comment