लासलगाव, ता. १९ : येथील नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणित कार्यशाळा झाली. संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य हसमुख पटेल अध्यक्षस्थानी होते. गौरव भंडारी व्याख्याते होते. मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य सचिन मालपाणी, प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ. सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी, सुनील गायकर, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सत्तार शेख आणि शिक्षक उपस्थित होते.
कार्यशाळेत गणन पूर्वतयारी, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, मापन, आकृतिबंध या सर्व गणित संबोधावर प्रात्यक्षिकआणि गणित शिक्षण मनोरंजक कसे होईल, याचे मार्गदर्शन झाले. बँकिंग परीक्षा व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना तयारी कशी आणि काय करावी, याचे सोप्या आणि रंजक पद्धतीने गौरव भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इंग्लिश मीडियम स्कूल आणि अकरावी व बारावीतील जवळपास ३०० हून अधिक विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले. सुनील गायकर यांनी सूत्रसंचालन केले. रामनाथ कदम यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी सचिन मालपाणी यांनी सहकार्य केले. यशस्वितेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उज्वल शेलार, किशोर गोसावी, सुनील गायकर यांनी परिश्रम घेतले.