बॉश इंडिया फाउंडेशन व स्माईल फाऊंडेशन यांचा स्माईल ऑन व्हील संयुक्त उपक्रम
नाशिक (२६ डिसेंबर) : नाशिक येथील बॉश इंडिया फाउंडेशनच्या व स्माईल फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील संत कबीर नगर, सातपूर येथे मोफत आरोग्य शिबीर व मार्गदर्शन संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३५१ जणांनी लाभ घेतला.
आरोग्य तपासणी शिबीराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिराकरीता डॉ. अमृता पाटील ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विपुल काळे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अनुगंध आहेर (त्वचारोग तज्ञ ), श्री.सुनील सालियान (नेत्र तपासणी), आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील व केतन पाटील यांनी यावेळी रुग्णांची तपासणी, निदान व औषधोपचार करून प्रभावी मार्गदर्शन केले.

स्माईल फाउंडेशन आणि बॉश इंडिया च्या माध्यमातून ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमा अंतर्गत नाशिक शहरातील मागासलेल्या १५ नागरी परीक्षेत्रात व त्र्यंबकेश्वर भागातील १५ मागासलेल्या व दुर्लक्षित खेड्यापाड्यात ‘मोबाईल मेडिकल युनिट’ (MMU) च्या माध्यमातून व नाशिक महानगर पालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांची टीम व औषधोपचार पोहचवून मदत पोहचवली जाते. बॉश इंडिया फाउंडेशन कडून आर्थिक सहकार्याच्या पाठबळावर या सामाजिक कार्यास गती प्राप्त झाली आहे.
शिबिराचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी गणेश ताठे, मनिषा भुजबळ, मयुरी बर्डे व समाधान मेढे यांनी विशेष परिश्रम घेतले.