भारत–अर्जेंटिना कृषी संशोधन व तंत्रज्ञान सहकार्यासाठी ICAR–INTA कार्ययोजना 2025–27 वर स्वाक्षरी

Share with others

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025 : भारत आणि अर्जेंटिना यांनी कृषी संशोधन, क्षमता निर्माण आणि तंत्रज्ञान आदान-प्रदान अधिक मजबूत करण्यासाठी ICAR–INTA कार्ययोजना 2025–2027 वर स्वाक्षरी केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि अर्जेंटिनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी (INTA) यांच्यातील या कार्ययोजनेची देवाणघेवाण डॉ. एम. एल. जाट, सचिव, कृषी संशोधन व शिक्षण विभाग (DARE) तसेच महासंचालक, ICAR आणि महाराजदूत मारीआनो ऑगस्टिन कॉकसिनो, अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत यांच्या हस्ते आज करण्यात आली.

या कार्ययोजनेअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शाश्वत कृषी पद्धती (झिरो टिलेजसह), कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन व फर्टिगेशन, पीक व पशु जैवतंत्रज्ञान, पशुधन सुधारणा, समशीतोष्ण व उष्णकटिबंधीय पिकांची उत्पादन तंत्रे, डिजिटल शेती, जैवसुरक्षा व वनस्पती स्वच्छताविषयक उपाय तसेच मूल्यसाखळी विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य केले जाणार आहे. अंमलबजावणी संयुक्त संशोधन, जर्मप्लाझम देवाणघेवाण, तज्ज्ञांची देवाणघेवाण तसेच नियोजित प्रशिक्षण व अध्ययन दौऱ्यांद्वारे केली जाईल.

प्रस्तावित प्रशिक्षण व अध्ययन कार्यक्रमांमध्ये ग्रीनहाऊस भाजीपाला उत्पादन, फुलशेती व समशीतोष्ण फळे, काढणीनंतरची शरीरक्रिया (पोस्ट-हार्वेस्ट फिजियोलॉजी), कार्यात्मक अन्न विकास, पशुवैद्यकीय निदान, प्रिसिजन पशुपालन, वेस्ट-टू-वेल्थ तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवाधारित पशुखाद्य सुधारणा, डिजिटल शेती तसेच स्वच्छता व वनस्पती आरोग्य प्रणाली यांचा समावेश आहे. जर्मप्लाझम देवाणघेवाणीत सोयाबीन, सूर्यफूल, मका, ब्लूबेरी, सिट्रस, रान पपईच्या प्रजाती, पेरू आणि निवडक भाजीपाला पिके यांचा समावेश असेल.

दोन्ही देशांनी तेलबिया व कडधान्यांच्या मूल्यसाखळ्या, कृषी यांत्रिकीकरण (झिरो-टिलेज, कापूस काढणी यंत्रणा व ड्रोनसह) तसेच फलोत्पादन मूल्यसाखळी विकास या क्षेत्रांत सहकार्य अधिक सखोल करण्यावर सहमती दर्शवली आहे. वनस्पती व पशु आरोग्य क्षेत्रात, फूट-अँड-माउथ डिसीज (FMD) निर्मूलनासाठी प्रदेशनिहाय धोरणे तसेच टोळधाड निरीक्षण व व्यवस्थापन यांसाठी तांत्रिक देवाणघेवाण व सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे.

भारत-अर्जेंटिना वैज्ञानिक भागीदारीप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत, कार्ययोजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक आढावा व मूल्यांकन यंत्रणा राबविण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

Related posts

Leave a Comment