अंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली.
कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून संविधानाचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचवला गेला.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजनकर्ते प्रा. सर नागेश जोंधळे यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय लोकशाहीसाठीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संविधानाचे संरक्षण आणि प्रसार या उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जोपासली.
या उपक्रमात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, आणि समाजातील मान्यवरांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांमध्ये कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, सिताफळ संशोधन केंद्राचे प्रा. गोविंद मुंढे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, प्रा. डॉ. इंद्रजीत भगत आणि ज्येष्ठ पत्रकार जगनबापू सरवदे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ‘आई’ संस्थेचे प्रशिक्षक आकाश गजभारे, प्रतीक गौतम, नारायण वाघमोडे, आदित्य पवार, जयदत्त कुलकर्णी, गणेश शिंपले, ओमकार दोनगहू, श्रीपाद शिंपले, ओमकार रूद्रे, सेजल रोडे, धनश्री देशमुख, सृष्टी जोगदंड, हर्षदा शिंदे, शिवमाला घोडके, निकिता काळे, शुभांगी गायकवाड, पृथ्वी कसबे, आरती राजमाने, आणि इतर विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या उपक्रमातून तरुणाईला संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा देशभक्तीपर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला.