नाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न

Share with others

“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले

नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

धम्मसंस्कृतीने महिलांना विशेष सन्मानाचे स्थान दिले, ज्यामुळे त्यांची उन्नती सुलभ झाली आहे, असे मंगेश दहिवले यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच, धम्मसंस्कृतीने या देशाला स्वातंत्र्य, समता, करुणा आणि मैत्री ही मूल्ये दिली आहेत, जे समाजाच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहेत.

या संमेलनात विविध मान्यवरांनी धम्मसंस्कृतीविषयक विविध मुद्द्यांवर विचार मांडले. प्रविण गायकवाड यांनी ‘बौद्ध धम्मामध्ये श्रद्धेचे महत्त्व’ या विषयावर भाष्य केले. धम्मसंस्कृतीचा अंगीकार दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. ऍड. प्रविण पंडित यांनी धम्मसंस्कृतीचे विस्तृत विवेचन करताना सांगितले की, धम्मसंस्कृतीमुळे देश आणि येणाऱ्या पुढील हजारो पिढ्या सुरक्षित राहू शकतात.

या संमेलनाच्या प्रमुख अतिथींमध्ये राज्य सचिव प्रकाश मोरे, नागपूर जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे, वाशीम जिल्हाध्यक्ष राहुल तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष मनोज खैरे, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, पाली भाषा अभ्यासक राजेंद्र भालशंकर, समता सैनिक दल प्रमुख मोहनभाऊ अढांगळे, लेणी संवर्धक सुनिल खरे, धम्म प्रचारक मिलिंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बी. वाय. पगारे आणि शिवदास म्हसदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात बौद्ध धम्माच्या अनुशंगाने श्रद्धेचे महत्त्व व उपोसथ सुत्तासारख्या धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले.

या राज्यस्तरीय संमेलनात नाशिकसह नागपूर, वाशीम, परभणी, संभाजीनगर, ठाणे, रायगड आणि मुंबई या विविध ठिकाणांहून आलेले धम्म बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन नाशिक जिल्हाध्यक्ष शशी सुलताने यांनी मानले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी भगवान भालेराव, दशरथ सोनवणे, राहुल बनसोडे, प्रमोद नरवाडे, अमोल खंदारे, सागर रामटेके, प्रदीप खंदारे, किरण काऊतकर, भारत भवरे, घनश्याम साळवे, सुनिल गायकवाड, संदीप ससाणे, रवि आढाव, प्रशांत त्रिभुवन, विनोद त्रिभुवन, बाळासाहेब नन्नावरे, सचिन अंभोरे आणि इंजि. सागर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts

Leave a Comment